फडके मंदिराचा समृद्ध वारसा शोधा - भक्ती आणि परंपरेचा वारसा.
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्।
बल्लाळम् मुरुडम् विनायकमढम् चिंतामणिम् थेवरम्।।
लेण्याद्रिम् गिरिजात्मकम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्।
ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्।।
देवगणांत श्रीगणेशाचे महत्त्व असेच परिपूर्ण आहे. मनःकामना पूर्ण करणाऱया ह्या देवावर भक्तांची अढळ श्रद्धा असते. मुंबापुरीतील गिरगावात गणेशभक्तांचे फडके श्रीगणपती मंदिर हे श्रद्धास्थान आहे. इतिहास घडविणारे मंदिर म्हणून फडके श्रीगणपती मंदिराकडे अंगुलिनिर्देश कराव लागेल. इ.स.१८६५ मध्ये अलिबाग (रायगड) जिल्हय़ातील आवास गावचे श्री गोविंद गंगाधर फडके हे मुंबईत राहण्यास आले. त्यांनी हायकोर्टात नोकरी धरली. ते स्नानसंध्या, देवपूजा व इतर धार्मिक कर्मे मोठय़ा निष्ठेने करीत असत. इ.स.१८६७ साली विठ्ठलभाई पटेल रोडवरील वृक्षराजीने नटलेली निसर्गसुंदर जागा त्यांनी विकत घेतली. श्री. गोविंदरावांच्या पत्नी सौ. यशोदाबाई ह्यासुद्धा धार्मिक वृत्तीच्या होत्या. ‘नित्य देवपूजा नित्य दानधर्म, जाणावे हे मर्म जीवनाचे’ हे जाणणाऱया त्या होत्या. त्यांच्या जीवनात एक उणीव प्रामुख्याने जाणवे. त्यांना संतती नव्हती. एखादा सुपुत्र जन्माला येऊन वंशाचा दिवा प्रज्वलित रहावा असे त्यांना नेहमी वाटे, पण श्री. गोविंदरावांच्या अकाली निधनाने पुत्रप्राप्तीची त्यांची इच्छा अपुरी राहिली. दत्तविधान कल्पना त्यांना मान्य झाली नाही. आपली धनदौलत मानवाला देण्यापेक्षा देवासाठी तिचा सदुपयोग व्हावा अशी त्यांना प्रबळ इच्छा झाली. ह्या इच्छेनुसार यशोदाबाईंनी ‘गजानन चिरंजीव जहाला’ ह्या भावनेने गणपती देवालय बांधण्याचा संकल्प सोडला. श्री. गोविंदरावांनी विकत घेतलेल्या जागेत सौ. यशोदाबाईंनी मोठा बागबगीचा तयार केलाच होता. त्या बागेला त्यांनी ‘गोविंदबाग’ व त्या परिसराला ‘फडकेवाडी’ अशी नावे दिली.सौ. यशोदाबाईंच्या संकल्पानुसार गणेशमंदिर बांधण्यास सुरुवात झाली व इ.स.१८९० चे सुमारास मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे गाभारा काळवत्री दगडाचा व बाहेरचे काम सफेद फरशीचे करण्यात आले. सुमारे सतरा हजार रुपये खर्च करून बडोद्याहून एका जयपूरनिवासी कारागिराकडून गणरायाची मूर्ति आणण्यात आली होती. सनईच्या मंगल सुरात, ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्राच्या जयघोषात व चौघडय़ाच्या ठेक्यात ‘मंगलमूर्ती मोरया’ मंदिरात स्थानापन्न झाला. कालचक्राप्रमाणे एक दिवस यशोदाबाईंना निजधामाचे बोलावणे आले व श्रीगजाननाचे नामस्मरण करीत त्यांनी इहलोक सोडला. मृत्यूपूर्वी गणेश मंदिराची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. श्री. बाळाजी पांडुरंग भालेराव हे फडके घराण्याचे स्नेही होते. त्यांच्या सल्ल्याने गणेश मंदिराच्या उत्पन्नासाठी त्यांनी विश्वस्त समिती नेमली.
१. श्री. बाळाजी पांडुरंग भालेराव हे विश्वस्त प्रमुख होते व धरमसी मोरारजी, शामराव पांडुरंग, श्री. धो. त्रिं. आपटे व श्री. वि. वि. बापट हे पहिल्या विश्वस्त समितीत होते. ह्या विश्वस्त समितीच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालू झाला. यशोदाबाईंचा वंशाचा दिवा नव्हता तरी गणपती मंदिराच्या विश्वस्त समितीने त्यांच्या पुण्यस्मरणाची व्यवस्था उत्तम रीतीने केली आहे. श्री. गोविंदराव व श्रीमती यशोदाबाई ह्यांच्या श्राद्ध व पक्ष या तिथ्यांचे कार्यक्रम प्रतिवर्षी केले जातात. विश्वस्तसमितीचे हे कार्य अभिनंदनीय खासच आहे. कालप्रवाहानुसार फडके गणपती मंदिरात बदल घडत गेला. इ.स.१९१८ मध्ये श्री. धरमसी मोरारजी खटाव ह्यांनी मंदिरात वीज आणली. विश्वस्त समितीत श्री. रघुनाथराव आपटे, श्री. भाऊसाहेब आपटे, श्री. दाजी भाटवडेकर व श्री. दि. प. दांडेकर ह्या उत्साही मंडळींची नेमणूक झाली. त्यांनी मंदिराच्या आवारात रस्त्यालगतच छोटय़ा दुकानांसाठी जागा भाडय़ाने देऊन उत्पन्नात भर घातली. मंदिराच्या पुढच्या बाजूस दरवाज्यावर मंदिरातील गणरायाची फ्लास्टरची प्रतिकृती बनवून भक्तगणांना चोवीस तास दर्शनाचा लाभ मिळावा अशी व्यवस्था केली. फडके गणपती मंदिर उत्तराभिमुखी आहे. बाहेरून मंदिर काहीसे चौकोनी दिसते. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच देवळाचा मुख्य भव्य सभामंडप लागतो. या सभामंडपात 200 माणसे बसू शकतात. सभामंडपात देवदेवतांच्या तसबिरी व हंडय़ा-झुंबरे लावलेली आहेत. प्रदक्षिणेच्या वाटेवर मुख्य देवाच्या पाठीमागे गणपतीची एक काचेची मूर्ती बसविण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा आठ फूट लांब व दहा फूट रुंद आहे. गणपतीची मूर्ती कमळावर मांडी घालून बसलेल्या थाटात आहे. मूर्तीचे कान विस्फारलेले आहेत. सोंड डावीकडे झुकलेली आहे. मूर्तीवर मुकुट रोज चढविला जातो. प्रत्यक्ष गाभाऱयात गणेशपंचायतन आहे. त्यात श्रीमहालक्ष्मी, श्रीविष्णु, श्रीगणपती , श्रीशंकर व श्रीसूर्यनारायण आहेत. मूर्तीच्या उभय बाजूस रिद्धिसिद्धि उभ्या ठाकलेल्या आहेत व त्यांच्या पुढे शिसवीचे हत्ती आहेत. मूर्तीसभोवतालचे मखर चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. मूर्तीवर उत्सवकाळात सुंदरशी छत्री फिरत असते. देवाच्या पायाशी गणपतीच्याच तसबिरी मांडून ठेवलेल्या आहेत. श्रीमूर्तीच्या चौरंगाच्या भोवती फुलांची आरास केलेली असते. गाभाऱयाच्या बाहेरील बाजूस उजवीकडे एक व डावीकडे एक असे दोन कोनाडे आहेत. एका कोनाडय़ात त्रिमूर्ती दत्तराजा व दुसऱयात कुंजविहारी कृष्ण यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱयाचा चांदीने मढविलेला दरवाजा, श्रीगणेशमूर्तीचे चांदीचे मखर व सुशोभित बसलेली श्रीमूर्ती बघून भाविकांच्या डोळय़ांचे पारणे फिटते. चांदीच्या दरवाजावर राष्ट्रीय पक्षी मयूर, वनराज सिंह, भव्य गजराज व पावित्र्यनिदर्शक स्वस्तिक चिन्ह छानदार नक्षीकामामध्ये कोरलेले असल्याने मंदिराची शोभा आणखीन वाढली आहे. कार्यकारी विश्वस्तांनी श्रीमंदिराच्या आवारात ‘यशोमंगल’ नावाची नवी इमारत इ.स. १९५९-१९६० साली बांधली. विवाह, यज्ञयाग प्रासंगिक धार्मिक कार्ये, सभा-संमेलने इत्यादींसाठी या इमारतीचा उपयोग केला जातो. अनेक वर्षे ‘यशोमंगल’ मधील यज्ञमंडपात आंग्रेवाडी (काळबादेवी) समस्त ब्रह्मवृंदमंडळातर्फे विष्णुयाग, गणेशयाग, शतचंडी व महारुद्र स्वाहाकाराचा कार्यक्रम केला जात असे. सध्या या मंदिराचे श्री. सुभाष दिगंबर दांडेकर,श्री.मधुसूदन यशवंत जोशी, सौ. उज्ज्वला प्रभाकर मेहेंदळे,श्री. मिलींद प्रभाकर वझे, श्री. सुरेश विनायक डोंगरे आणि श्री. यशोधन विश्वनाथ दिवेकर असे विश्वस्त असून श्री. हेमंत मधुसूदन जोशी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. फडके श्री गणपती पारंपारिक माघी उत्सव ही गिरगावची संस्कृती आणि वैभव आहे.हजारो भक्तांच्या साक्षीने दरवर्षी हा उत्सव कीर्तने, प्रवचने आदि परंपरेनुसार साजरा होतो. ट्रस्टतर्फे माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जातो. जन्मोत्सव आणि ज्ञानप्रबोधन असे उत्सवाचे पारंपारिक स्वरूप असते. अंगारकी, संकष्टी चतुर्थी अशा दिवशी हजारो भाविक फडके श्रीगणेशाचे दर्शन घेतात. अनेक प्रख्यात गायक, नट ,कलाकार आणि समाजातील सन्मान्य व्यक्ती फडके गणपतीच्या दर्शनासाठी येतात. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक सेवेचे व्रत गेली कित्येक दशके फडके ट्रस्टने जपले आहे. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजनेनुसार ट्रस्टचा संपूर्ण कारभार हा कॅशलेस झाला आहे. सुमारे २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते.संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या वेदपाठशाळा व त्यात अध्ययन करणाऱ्या स्नातकांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचे काम संगणकावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले. शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली निरलसतेने समाजसेवा करणाऱ्या सुमारे ५० संस्थांना ट्रस्टतर्फे आर्थिक मदत केली गेली आहे. जून महिन्यात ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक योजना, गरजू कुटुंबांसाठी ‘अन्नदान’ हा तहहयात उपक्रम ट्रस्टने घेतला असून त्याद्वारे क्षयरोगी रुग्णांना मदत करण्यात आली. त्यासाठी ट्रस्टला भारत शासनाचे प्रशस्तीपत्र मिळाले आहे. डोंगरी बालसुधारगृह ‘उडान’ उपक्रमांतर्गत ट्रस्टशी जोडले गेले आहे. मेडिकल कॅम्प , लहान तसेच पौगंडावस्थेतील मुलांचे समुपदेशन,पर्यावरण असे विविध क्षेत्रातील कार्यक्रम ट्रस्टमध्ये आयोजित केले जातात.
शतकोत्तर चौतीसाव्या (१३४) वर्षात पदार्पण करत असताना उत्तरोत्तर हा सामाजिक वसा वाढविण्याचा ट्रस्टचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एकूणच पहाता आदर्श ट्रस्ट म्हणून ट्रस्टची वाटचाल सुरू आहे. सर्व भक्तांचे दु:ख दूर होऊन सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समाधान लाभो हीच त्या श्रीगणेशचरणी प्रार्थना .
मंगलमूर्ती मोरया ! गणपती बाप्पा मोरया !